Be Gallery Photo |
अहेरी :- आई-वडिलांमधील वाद मिटवण्यासाठी गेला असता वडिलांनी मारहाण केल्याने रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या तरुणाने गावाजवळील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री पेरमिली गाव परिसरात घडली. सनातन सुनील बिस्वास (18) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सनातन बिस्वास हा गावातील एका गॅरेजमध्ये वाहन दुरुस्तीचे काम करीत होता. घटनेच्या दिवशी तो दुकानातून रात्री घरी पोहोचताच आईवडिलांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे मध्यस्थी करण्यासाठी तो गेला असता वडिलांशी त्याचा वाद झाला.
यावेळी वडिलांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे तो रात्रीच घरातून जंगलाच्या दिशेने निघून गेला: कुटुंबियांनी त्याचा जंगल परिसरात शोध घेतला असता तो सापडला नाही. गुरुवारला सनातनचा मृतदेह जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. घटनेबाबत पेरमिली उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास प्रभारी अधिकारी सोनुने करीत आहेत. घटनेबाबत विविध प्रकारच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत.