नागपूर : नागपूर जिल्ह्यात मध्यरात्री पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. जिल्ह्यात काही ठिकाणी गारादेखील पडल्या असून शहरातदेखील मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र, या पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
मध्यरात्रीनंतर अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाला. मात्र सकाळी पावसाचा जोर वाढला असून रब्बी पीकांना या अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. शहरात पावसामुळे बऱ्याच भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. शिवाय अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती दिसून आली. एकीकडे वाढती थंडी आणि दुसरीकडे पाऊस यामुळे गारठा आणखी वाढला आहे.
दरम्यान नागपूर शहर व आजूबाजूच्या परिसरात सकाळपासूनच आलेल्या अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. शहरातदेखील मुसळधार पाऊस असून नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. एकीकडे थंडी आणि दुसरीकडे पाऊस अशा वातावरणात हिवसाळा असल्याचीच चर्चा सुरू आहे.