गडचिरोली: शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या कठाणी नदीच्या डोहात बुडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. वसंत तुकाराम ठमके (६४, रा. रामनगर वार्ड, गडचिरोली) असे मृतकाचे नाव आहे.
कठाणी, वैनगंगा नदीच्या संगमाजवळ कठाणी नदीपात्रात डोह आहे. या डोहात मृतदेह तरंगत असल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्याने याबाबतची माहिती पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये १४ नोव्हेंबर रोजी
राहुल ठमके यांनी आपले वडील घरून निघून गेल्याची तक्रार गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी राहुलला मृतदेह ओळखण्यासाठी बोलविले. त्याने सदर मृतदेह आपल्या वडिलांचा असल्याचे सांगितले. शुक्रवारी नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द केला. गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये मर्ग दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्या करणाऱ्या वसंत यांची मानसिक स्थिती बिघडली होती. त्यामुळे ते घरातून निघून गेले, अशी तक्रार मुलाने पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली होती.