मुंबई (Mumbai) : राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क नुसार परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता दहावी, बारावीच्या शिक्षणाप्रमाणे इयत्ता नववीच्या शिक्षणाला महत्त्व प्राप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-२०२३ मध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम व परीक्षा पध्दतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना आवडीचे १६ अभ्यासक्रम शिकण्याची सोय राहणार आहे. विद्यार्थ्यांना नववीपासूनच आपल्या भविष्यातील शिक्षणाची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे दहावी, बारावी प्रमाणेच आता इयत्ता नववीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे.
बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेवून भविष्य घडविण्याबाबत विद्यार्थी अनेकदा तणावाखाली असतात. यामध्ये पास होण्यासाठी विद्यार्थी महागडे कोचिंग क्लासेस लावतात. एवढे पैसे आणि मेहनत खर्च करुन परिक्षेत अपयश आले तर विद्यार्थी अनेकवेळा टोकाचे पाऊलही उचलतात. ही समस्या लक्षात घेऊन राष्ट्रीय फ्रेमवर्क नुसार परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार इयत्ता नववी ते बारावीचा अभ्यासक्रम अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात आपले भविष्य घडवायचे आहे हे स्वतःला ठरवता येईल. दहावीपर्यंत विविध विषयांचा तपशीलवार अभ्यास करून जाणून घेतल्यावर त्याला अकरावीत तीन पर्याय मिळतील.
जाणून घेवूया या पर्यायाविषयी :
1. पहिल्या पर्यायात मानवता, सामाजिक विज्ञान, विज्ञान, गणित आणि संगणक हे विषय असतील.
2. दुसऱ्या पर्यायात आंतरविद्याशाखीय क्षेत्र असेल, ज्यांना पदवीनंतर संशोधन क्षेत्रात भविष्य घडवायचे आहे, त्यांच्यासाठी हा पर्याय असेल.
3. तिसऱ्या श्रेणीत लेखक, क्रीडा आणि व्यावसायिक हे विषय निवडण्याचा पर्याय असेल.
अभ्यासक्रम आणि विषयांचे वर्गीकरण :
1. मानवता – भाषा, साहित्य, तत्वज्ञान
2. समाजशास्त्र – इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र
3. विज्ञान – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र
4. गणित आणि संगणक – गणित, संगणक विज्ञान, व्यवसाय गणित
5. व्यावसायिक कौशल्य विकास – संगीत, नृत्य, नाट्य, चित्रकला
6. क्रीडा – खेळ, योगा
7. आंतरविद्याशाखा – वाणिज्य, आरोग्य, माध्यम, समुदाय विज्ञान, भारताचे ज्ञान, कायदेशीर अभ्यास
महत्वाचे : इयत्ता दहावी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना नववी, दहावी या दोन वर्षात एकूण आठ अभ्यासक्रमांपैकी प्रत्येकी दोन आवश्यक अभ्यासक्रम पूर्ण करावे लागतील. सध्या दहावी बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना किमान पाच विषयांचा अभ्यास करावा लागतो. परंतू, नव्या नियमांमध्ये आठ विषय देण्यात आले आहेत. यामध्ये मानवता, गणित, संगणक, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला शिक्षण, सामाजिक विज्ञान, विज्ञान आणि आंतरविद्याशाखीय विषय आहेत.
या बदलाविषयी बोलताना शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक रुपेश मोरे म्हणाले, अकरावी, बारावीत विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य लक्षात घेऊन विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना आवडीचे १६ अभ्यासक्रम शिकता येतील. त्यासाठी विद्यार्थ्याला आता नववीपासूनच भविष्याची तयारी सुरू करावी लागेल. त्या अनुषंगाने विद्यार्थ्याला सर्व विषय शिकवले जातील, जेणेकरुन बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यायचा याबाबत विद्यार्थ्याचा गोंधळ होणार नाही.