गडचिरोली :- कुटूंबियांनी रागावल्याने आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गडचिरोली शहरातील वनश्री कॉलनीत शनिवारला सायंकाळच्या सुमारास घडल्याने कुटूंबियांना धक्का बसला आहे. आर्या भास्कर बांबोळे वय १५ वर्षे वनश्री कॉलनी गडचिरोली असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,आर्या ही नवेगाव येथील नवजीवन पब्लिक स्कूल येथे इयत्ता आठव्या वर्गात शिकत होती.शनिवारला आर्याच्या आईवडिलांनी तिला काही कारणासाठी रागावले.त्यामुळे नाराज झालेल्या आर्याने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घरातच गळफास घेवून आत्महत्या केली.घटनेच्या वेळी आर्याचे वडिल नोकरीवर गेले होते तर आई आर्याच्या लहान भावाला शिकवणीतून आणण्यासाठी गेली होती.हीच संधी साधून आर्याने हे टोकाचे पाऊल उचलले.लहान मुलाला घेवून आई घरी येताच घटना उघडकीस आल्याने आईने एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे.