चंद्रपूर : शहरातील विविध भागातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व प्रसंगी अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या १० मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध चंद्रपूर महानगरपालिकेने तक्रार करून गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे तासन्तास ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघातीही घडतात. महापालिकेकडून अनेकदा कारवाईही केली जाते. परंतु तरीही सदर समस्या वाहतुकीला डोकेदुखी ठरत असल्याने मोकाट जनावरांविषयीचा प्रश्न आयुक्त विपीन पालीवाल यांनी गांभीर्याने घेतला असुन सध्या १० मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहर व लगत परिसरात मोठ्या प्रमाणात जनावरांचे गोठे आहेत. जनावरांचे काही मालक हे जनावरे सकाळी मोकाट सोडून देतात. सोडून दिलेली ही मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडतात. बहुतांशी मुख्य रस्ते, चौक येथे मोकाट जनावरांनी रस्ता अडविलेला असतो. यातून अनेकदा गंभीर अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवते.
याबाबत प्राप्त तक्रारीनुसार मनपाकडून कारवाईही केली जाते. मात्र, अलीकडे जनावरांचे कोंडवाडा राहिलेले नाहीत. गोशाळांमध्ये ही जनावरे जमा केल्यानंतर मालक तेथून ती सोडवून आणतात आणि पुन्हा ती जनावरे रस्त्यावर मोकाट फिरतात. त्यामुळे मनपाने आता या पशुपालकांनाच चाप लावण्याच्या दृष्टीने कारवाई सुरु केली आहे.
मोकाट जनावरे पकडुन पोलीस तक्रार करण्याची मोहीम यापुढेही सुरु राहणार असुन ती अधिक तीव्र करण्यात येणार असुन पशुपालन करणाऱ्या संबंधितांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकळे न सोडण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.