नागपूर : बेरोजगार असलेल्या प्रियकरासोबत लग्न करण्यास प्रेयसीच्या कुटुंबाने नकार दिला. मात्र, त्याच तरुणीचे प्रियकराच्या काकाशीच लग्न ठरले. नात्याने काकू असलेल्या प्रेयसीसोबत पुतण्याने लग्नानंतर पलायन केले. काकाने भरोसा सेलमध्ये तक्रार केली. पोलिसांनी तिघांनाही एकमेकांसमोर बसवून त्यांचे समूपदेशन केले आणि कौटुंबिक तिढा सुटला. काका-काकू यांनी पुन्हा संसार थाटला तर पुतण्यानेही काकाचा संसार बघता माघार घेतली.
उमेश (२६) आणि शुभांगी (२१) (बदललेले नाव) हे मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट शहरात राहतात. दोघांचेही एकमेकांवर दहावीपासून प्रेम. दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र, उमेश बेरोजगार असल्यामुळे शुभांगीच्या आई-वडिलांनी उमेशला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे उमेश कामाच्या शोधात नागपुरात आला. त्याला नागपुरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. वर्षभरानंतर तो घरी आला असता शुभांगीच्या कुटुंबियांनी तिचे उमेशचे काका संजय याच्याशी लग्न ठरवले होते. दोघांचा साखरपुडाही झाला होता. उमेश आणि शुभांगी पेचात पडले. मात्र, कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून उमेशने माघार घेतली. प्रेयसी शुभांगी काकाची पत्नी म्हणून कुटुंबात नांदायला आली. मात्र, दोघांचेही प्रेमसंबंध कायम होते. त्याबाबत काका संजय आणि कुटुंबीय अनभिज्ञ होते. यादरम्यान शुभांगीला दोन मुले झाली. सर्व काही सुरळीत सुरू होते. करोना काळानंतर काका संजय आणि उमेश हे दोघेही नागपुरात एका हॉटेलमध्ये नोकरीसाठी आले. काका-काकू आणि पुतण्यासह पारडीत एकाच घरात राहायला लागले.
पळून जाऊन करायचे होते लग्न
शुभांगी आणि उमेश दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही चिठ्ठी लिहून पळ काढला. काका संजयच्या पायाखालची जमीन सरकली. दोन्ही मुलांचा विचार न करता पत्नी पळून गेल्याने तो चिंतेत पडला. मुलांसाठी तरी पत्नी परत येईल, या आशेने संजयने आठ दिवस वाट बघितली. त्यानंतर त्याने भरोसा सेलमध्ये पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांच्याकडे तक्रार केली.
तिघांचेही समूपदेशन आणि तिढा सुटला
पती संजय यांच्या तक्रारीवरून सीमा सूर्वे यांनी पळून गेलेल्या दोघांचेही लोकेशन काढून शोध घेतला. त्यांना भरोसा सेलमध्ये आणले. संजय दोन्ही मुलांसह तेथे पोहोचला. तिघांनाही समोरासमोर बसवून त्यांचे समूपदेशन केले. उमेशची समूजत घातली आणि शुभांगीला दोन्ही मुलांचा विचार करण्याची संधी दिली. दोघांनाही चूक उमगली. उमेशने थेट गाव गाठण्याचे ठरविले तर काका-काकूंचा पुन्हा संसार फुलला.