गडचिरोली/वडसा: जिल्ह्यात दारूबंदी अन... मोहटोला परिसरात खुलेआम दारू विक्री; दारू तस्करीला आशीर्वाद आहे तरी कोणाचा ? | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,wadsa,Wadsa news,Wadsa live,Wadsa Today,
Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli News IN Marathi,wadsa,Wadsa  news,Wadsa live,Wadsa Today,Desaiganj,

मोहटोला (किन्हाळा) : जिल्ह्यातील दारूबंदी नाममात्र असून अनेक गावात राजरोसपणे दारू विक्रीचे अड्डे चालू आहेत. यास देसाईगंज/वडसा  तालुका देखील अपवाद नाही. मोहटोला परिसरातील पोटगाव, पिंपळगाव (ह.) व डोंगरगाव (ह.) येथे तर दारूचा महापूर आहे. अलीकडेच मोहटोला व विहिरगाव येथील ग्रामसभांनी दारूबंदीचा सर्वानुमते ठराव घेतला व गावातील दारूबंदी केली. त्यामुळे या गावातील शौकिनांचा लोंढा ज्या गावात दारू विक्री केली जात आहे, त्या गावाकडे आपसुकच वाढला आहे. सायंकाळच्या वेळेस तर या गावांना जत्रेचा स्वरूप येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैधरित्या होत असणाऱ्या दारू विक्रीस आशीर्वाद कोणाचा? असा प्रश्न निर्माण होत आहे.

जागोजागी मुबलक प्रमाणात दारू उपलब्ध होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचा कल देखील दारू पिण्याकडे वाढल्याचे चित्र आहे. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झालेत तर काहींचे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. सामाजिक स्वास्थ्य बिघडत जात आहे.

तंटे भांडणांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेतमजूर उपलब्ध होईनासे झालेत. सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याने महिलांना एकटी-दुकटी बाहेर फिरताना भीती वाटत आहे. तरुणांमधील व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बोगस दारू पिण्यामुळे आरोग्याच्या समस्या सुद्धा वाढल्या आहेत. एखाद्याची दारू पकडली की लगेच जमानत होते, त्यामुळे दारू विक्रेते मुजोर झाले आहेत.


झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी काही महिला देखील या व्यवसायात उतरल्या आहेत. पोटगाव येथील गोपाळ टोलीवर तर अनेक महिला दारू विक्रीचा व्यवसाय राजरोसपणे करीत आहेत.

जोमात सुरू असणारी दारू विक्री कोणाच्या आशीर्वादामुळे आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


गडचिरोली जिल्ह्यात कायद्याने दारुबंदी असली तरी येथे मोहफूल, देशी-विदेशी दारू पाहिजे तेव्हा उपलब्ध होते. काही ठिकाणी तर फोन करा, दारू मिळवा, असाही फंडा सुरु आहे. विशेष म्हणजे, मोहफूल दारू शौकिनांची संख्याही बरीच आहे. जंगलालगतच्या गावात मोहफूल दारूविक्रीचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. दुर्गम भागात पोलिसही वेळेवर पोहोचत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.