भंडारा : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पाच्या परिसरातील प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्पाला आज विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी आज भेट देवून पाहणी केली. राज्य शासनाच्या महत्वाच्या प्रकल्पापैकी एक असलेल्या या जलपर्यटन प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याने विहीत वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके, गोसेखुर्द प्रकल्पाचे अभियंता शर्मा, पर्यटन महामंडळाचे सारंग कुळकर्णी,(अधिक्षक अभियंता, नागपूर) दिलीप देवळे हे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्रीय मार्ग निधीतून आंभोरा येथे सुरू असलेल्या मोठया पुलाच्या बांधकामाची पाहणी त्यांनी केली. यामध्ये पूलाच्या भंडारा बाजूच्या पोचमार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सध्या केबल स्टे पुलाच्या ७०५ मीटर लांबीचे काम पूर्ण झाले असुन पायलॉनच्या स्लॅबचे काम देखील पूर्ण झाले आहे. पुलांच्या मध्य भागाच्या पिल्लरच्यावर ४० मीटरवरील उंचीवरून प्रेक्षकांना आजुबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहता येणार आहे. येथे असणाऱ्या लिफट, आपातकालीन व देखभालीसाठी असणाऱ्या सर्व सुविधांची पाहणी त्यांनी केली.
या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर हॉटेल, उपहारगृह आणि इतर पर्यटन निगडीत उदयोगात गुंतवणूक वाढेल व पर्यायाने स्थानिकांना रोजगार मिळेल. प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्ण होण्यासाठी कामाची गुणवत्ता वेळोवेळी तपासण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. त्यानंतर गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. त्यामध्ये प्रकल्पाची क्षमता व पूर नियंत्रणाच्या कामाची माहिती त्यांनी घेतली. गोसेखुर्द प्रकल्पाचे अभियंता शर्मा यांनी यावेळी प्रकल्पाविषयीची सविस्तर माहिती दिली. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी नागरिकांना वेळेत माहिती देण्याचे तसेच मध्य प्रदेश शासनाच्या पूर नियंत्रण विभागाशी समन्वय ठेवण्यात यावे, असे ही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
गोसीखुर्द जलाशय जिल्हा भंडारा येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नुकतीच राज्य शिखर समीतीसमोर या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
गोसीखुर्द जलाशयात ४५ किमी जलप्रवास पात्र आहे. याठिकाणची नैसर्गिक विविधता, मोठ्या बेटांची उपलब्धता असल्याने आंतरराष्ट्रीय जलपर्यटन करण्यात येणार आहे.
देशातील सर्वोत्तम असा हा जलपर्यटन प्रकल्प वेळेपूर्वी जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना शिखर समितीत देण्यात आल्यात. हा प्रकल्प भंडारा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर होत असून याठिकाणी सुरू असलेला अंभोरा मंदीर विकास प्रकल्प आणि जलपर्यटन प्रकल्प एकत्रित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.