कुरखेडा :- तालुक्यातील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात बारावी परीक्षेत कॉपी करण्यासाठी पैसे उकळणाऱ्या केंद्रप्रमुखाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता.या प्रकरणात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या नागपूर येथील सचिवांनी कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार, ९ मार्च रोजी तहसील दारांनी केंद्रप्रमुख प्रा.किशोर अंबरदास कोल्हे याच्याविरोधात कुरखेडा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. यामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा १२ वी फेब्रुवारी, मार्च २०२३ परीक्षा केंद्र ६२७ केंद्र संचालकाबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओ व त्या अनुषंगाणे शिक्षण विभाग माध्यमिक व उच्च माध्यमिक सदर बाबीचे गांभीर्य विचारात घेवून गटशिक्षणाधिकारी तथा तालुका परीरक्षक सी.ए.पुराणिक यांनी चौकशीचे आदेश देण्यात आले. सदर चौकशीचा अहवाल व सचिव,विभागीय मंडळ नागपुर यांनी केलेल्या सूचनेनुसार तात्काळ किशोर अंबरदास कोल्हे यांचे केंद्रसंचालक पदावरून पदमुक्त केले असून त्यांचे ऐवजी कालीदास पुंडलीक सोरते उच्च माध्यमिक शिक्षक यांची नियुक्ती केंद्र संचालक म्हणून करण्यात आली आहे. तसेच सदरच्या गंभीर प्रकाराबाबत चौकशी करणेबाबत विभागीय सचिव यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना आदेश दिले आहेत. इयत्ता १० वी १२ वी च्या परीक्षा संबंधाने कोणताही गैरप्रकार झाल्यास दोषी विरुध्द नियमानुसार कडक कार्यवाही केली जाईल; असे शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा सदस्य सचिव जिल्हा दक्षता समिती गडचिरोली आर.पी.निकम यांनी दिले आहे.