नागपूर:- मॉडेलिंग करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणीच्या प्रयत्नांना यश आले नाही व घर सोडल्यानंतर ती देहव्यापाराच्या जाळ्यात अडकली. मॉडेलिंगच्या नावाखाली तरुणीकडून देहव्यापार करून घेणाऱ्या दलालाला पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. विक्की राजू कदमवार (३१, हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव असून त्याने हॉटेलमध्ये आंबटशौकिन ग्राहकांना तरुणींना पाठविण्याची बाब समोर आली आहे.
मध्यप्रदेशातील २१ वर्षीय मुलीचे मुंबईत जाऊन मॉडेलिंग करण्याचे स्वप्न होते. अंतिम वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या या तरुणीच्या कुटुंबात आई- वडील व लहान भावंडे आहेत. मॉडेल बनण्याच्या इच्छेने ती नागपूरच्या काही लोकांच्या संपर्कात आली. फोटो सेशनसाठी ती शहरात येऊ लागली. दरम्यान, वर्षभरापूर्वी तिथी जयताळा येथील एका विद्यार्थिनीशी ओळख झाली. मॉडेलिंगमधून कमाई करू शकत नाही ही बाब तिच्या लक्षात आली. जयताळा येथील संबंधित विद्यार्थिनीने तिला पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी तयार केले.
विद्यार्थिनीच्या माध्यमातून भेटलेल्या ग्राहकाने तिची विक्कीशी ओळख करून दिली. त्यानंतर विक्कीने तिला अनेक ग्राहकांकडे पाठविले. पीडित विद्यार्थिनी विकीच्या सांगण्यावरून ‘फोटो शूट’च्या नावाखाली नागपुरात येऊन वेश्याव्यवसाय करत असे. याची माहिती एसएसबीच्या पोलिस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांना मिळाली. एका डमी ग्राहकामार्फत त्यांनीविक्कीशी संपर्क साधला. विकीने आठ हजार रुपयांत सौदा केला. त्याने डमी ग्राहकाला मनीषनगर येथील हॉटेल डेस्टिनीमध्ये बोलावले. तेथे डमी ग्राहकाकडून पैसे घेताच पोलिसांनी विक्कीला पकडले. विकी जुन्या ग्राहकांच्या माध्यमातून आलेल्या लोकांनाच सेवा देतो. ग्राहकाकडून मिळालेल्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम तरुणीला दिली जात होती. तरुणीच्या नातेवाइकांना मुलीचे सत्य माहिती नाही. विक्कीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक वर्षांपासून देहव्यापाराचे रॅकेट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विक्की हा गेल्या काही वर्षांपासून देहव्यापार दलालीचे काम करतो. त्याने अनेक अल्पवयीन आणि शाळकरी मुलींना देहव्यापारात ढकलून आंबटशौकिन ग्राहकांकडे पाठविल्या आहेत. कोरोनापूर्वी विक्की बेरोजगार होता. लॉकडाऊनपासून तो या व्यापारात उतरला. अगोदर तो मित्रांना काही तासांसाठी पाचशे रुपयात खोली भाड्याने द्यायचा.