कोरची:- 'वाट पाहीन पण , एसटीनेच जाईन , असा लौकिक प्रवाशांमध्ये कायम ठेवून असलेली एसटी सर्वसामान्यांची संजीवनी आहे. मात्र सुरक्षिततेबाबत एसटीच्या गडचिरोली आगारात उदासीनताच असल्याचे दिसून येते.
गडचिरोली आगारातील गडचिरोली वरून कोरची ला येणारी दुपारची दोनची बस ही बेळगाव घाटालगत पंचर झाली. पंचर झाली असे समजताच प्रवाशांनी चालकाला विचारणा केली असता, बस मध्ये स्टेपनी नाही म्हणून सांगण्यात आले. सदर बस बेळगाव घाटाजवळ पंचर झाल्यामुळे सर्वत्र घनदाट जंगल असल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. तसेच प्रवाशांनी चालकास विचारणा केली कोरची ला जायचे कसे ?याबाबत चालक व वाहक यांनी आपण आपली व्यवस्था करावी, कारण एसटीमध्ये स्टेफनी नसल्यामुळे त्यांना स्टेफनी करिता कोरची ला जाऊन पुन्हा वापस यायला कमीत, कमी एक ते दीड तास लागेल, असे उत्तर दिले.
यामुळे बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली. ज्या मार्गावर बस पंचर झाली त्याठिकाणी कुठल्याही प्रकारचा नेटवर्क नसल्यामुळे प्रवाशांना बऱ्याच दूर पायी जावे लागले व मिळेल त्या वाहनाने कोरचीपर्यंत यावे लागले. सदर या महामार्गावर घनदाट जंगल असून या बसमध्ये प्रवासी एक वृद्ध स्त्री व दोन महिला व तीन तरुण होते. वृद्ध महिला दवाखान्यातून सुट्टी घेऊन घरी येत होती. याच मार्गावरून जातांना अनेक जंगली प्राणी आढळून येतात. समजा एखाद्याचा प्राण्यांमुळे घात झालाच असता तर जबाबदार कोण ? असा प्रश्न त्या प्रवाशांच्या परिवारातून करण्यात येत आहे.
कोरची ला येणाऱ्या गडचिरोली आगारातील बसेस हे नेहमीच काही ना काही कारणास्तव यांमध्ये बिघाड होत असते. यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच बसमध्ये स्टेफनी नसणे ही अत्यंत अशोभनीय बाब असून गडचिरोली आगारातून जाणाऱ्या बस हे अतिशय दुर्गम भागात जात असून अशा बसेसला स्टेफनी नसेल तर या आगारातील बसेस तसेच अधिकारी कुचकामी नाही काय? असा प्रश्न नागरिकाकडून निर्माण होत आहे.