दिल्ली : संपूर्ण देश श्रद्धा हत्याप्रकरणामुळे हादरलेला असताना आता असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. मे महिन्यात दिल्लीच्या पांडव नगर येथील रामलीला ग्राऊंड आणि नाल्यात मानवी अवयव सापडले होते. याप्रकरणी आता दिल्ली पोलीस गुन्हे विभागाने आरोपींना अटक केली आहे. अंजन दास असं हत्या झालेल्या इसमाचं नाव असून त्याची पत्नी पूनम आणि सावत्र मुलगा दीपक यांनी मिळून ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणी तपास सुरू झाला आहे. ज्या भागात अवयव सापडले त्या भागातील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासले आहे. या तपासणीत ज्या 2 व्यक्ती दिसल्या त्यांना शोधून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. चौकशी दरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम आणि दीपक अशी आरोपींची नावं आहेत. पूनमनं तिचा पती अंजन दासला नशेच्या गोळ्या खाऊ घातल्या होत्या. यानंतर मुलगा दीपकच्या मदतीनं त्याची हत्या केली. हत्येनंतर अंजन दासच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. ते फ्रीजमध्ये लपवून ठेवण्यात आले. नंतर या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यात आली. अंजन दासचे अनेक महिलांशी अवैध संबंध होते. त्यावरून घरात वाद व्हायचे. एके दिवशी वाद वाढला आणि पत्नी आणि मुलानं अंजन दासला संपवलं. ही कबुली पूनम आणि दीपकने दिल्ली पोलिसांसमोर दिली आहे.