१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे कोलकाता येथून अपहरण करून तिच्याकडून जबरदस्तीने देहव्यवसाय करण्यात येत असल्याची तक्रार नागपुरातील एका सामाजिक संस्थेने चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे केली. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर यांची दोन पथके गठित केली. या पथकाने ब्रह्मपुरी गाठून मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेट कॉलनी बंगला क्रमांक १४ येथे बनावट ग्राहक पाठवून शाहनिशा केली. बनावट ग्राहकाने इशारा करताच बंगल्यावर धाड टाकली. यावेळी कोलकाता येथून देहव्यापारासाठी अपहरण केलेल्या एका मुलीची पोलिसांनी सुटका केली.
या प्रकरणात मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेटमध्ये वास्तव्यास असलेल्या मंजित रामचंद्र लोणारे, चंदा मंजित लोणारे या दाम्पत्यावर कलम ३७०, ३७० (ए), सहकलम ३, ४, ५, ६, ७ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ सहकलम ४, ६, ८, १२ अन्वये अटक केली आहे. त्या मुलीकडून नागपुरातील दलालांनी वेगवेेगळ्या ठिकाणी देहव्यवसाय करून घेतल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, एसडीपीओ मिलिंद शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक मनोज गजबे, एपीआय संदीप कापडे, एपीआय मंगेश भोयर, राजेंद्र खनके, स्वामीदास चालेकर, गणेश भोयर, गोपिनाथ नरोटे, प्रदीप मडावी आदींनी केली.