चिमूर : तालुक्यातील महादवाडी येथील एका विधवा महिलेची शेती वाघेडा येथे आहे. तिच्या शेतीलगत वाघेडा येथील भैय्याजी निंबा मेश्राम यांची शेती आहे. भय्याजीच्या पत्नीची तब्बेत बिघडली. अनेक ठिकाणी उपचार केल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. एका मांत्रिकाने हा जादूटोण्याचा ( Witchcraft ) प्रकार असल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचीही तब्बेत बिघडली. त्यामुळे जादुटोणा ( Witchcraft ) केल्याच्या संशयावरून शेतीकडे जात असलेल्या त्या विधवा महिलेला भैय्याजी आणि त्याचा मुलगा देवानंद याने मारहाण केली. तसेच महिलेच्या पुतण सुनेला सुद्धा मारहाण करण्यात आली.
महादवाडी येथील शशिकला प्रकाश बारसागडे (वय ४५) असे या विधवा महिलेचे नाव आहे. शेती वाघेडा शेतशिवारात असल्याने ती महादवाडी येथून वडसीमार्गे वाघेडा येथे पायदळ शेतावर जाते. तिच्या शेताजवळ वाघेडा येथील भैय्याजी निंबाजी मेश्राम (वय ६५) याची शेती आहे. एक वर्षापुर्वी भैय्याजी मेश्राम याच्या पत्नीची अचानक तब्बेत खराब झाली. त्यांनी बऱ्याच खासगी रुग्णालयात उपचार घेतला. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर मांत्रिकाकडे दाखविले. त्याने जादूटोणा ( Witchcraft Black magic ) केल्यामुळे तब्येत बिघडल्याचे सांगितले. दरम्यान, पत्नीनंतर सहा आॅगस्टला घरातील सर्व सदस्यांची एकाचवेळी प्रकृती बिघडली. त्यामुळे जादूटोण्याचा संशय आणखी बळावला.
गुरुवारला विधवा महिला नेहमीप्रमाणे वाघेडा येथे शेतावर जाण्यास निघाली. त्यावेळी भैय्या मेश्राम यांनी तिला जादूटोणा केल्याच्या संशयावरुन मारहाण केली. त्याचा मुलगा देवानंदने सुद्धा शशिकलावर हात उगारला. त्यानंतर देवानंदने शशीकलच्या घरी जावून सून अनिता हिलासुद्धा मारहाण केली. घडलेल्या प्रकारची तक्रार पोलिसात दिली.
वैद्यकीय अहवाल आल्यानंतर भैय्याजी आणि देवानंद मेश्राम यांच्यावर भादंवि ३५४ (अ), ३२३, ५०६, ३४ भादंवि सहकलम ३ (२) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. मारहाण करणाऱ्या बापलेकाला अटक करण्यात आली आहे.