कोरची ( Korchi ) : येथील व्यापारी मुकेश निनावे (39) हे आत्महत्येची चिठ्ठी लिहून बेपत्ता ( missing after writing suicide note ) झाले आहेत. देसाईगंज जवळच्या पुलावर शनिवारी दुपारी 2 वाजता अंगात घातलेली पॅन्ट, टी-शर्ट, चष्मा, आधार कार्ड, पाकिट तसेच आत्महत्येची चिठ्ठी सापडली आहे. त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुकेश निनावे हे कोरची येथून शुक्रवारी बेपत्ता झाले. त्यांची दुचाकी एका स्वीट मार्टच्या दुकानासमोर आढळून आली आहे. निनावे हे आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले असे बोलले जात आहे. कोरचीतील एका शिक्षकाने निनावे यांना वैनगंगा पुलावर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता बघितले होते. शिक्षकाने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची तक्रार कोरचीच्या पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.