मुंबई : राज्यात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलं आहे. पेट्रोल पाच रुपये तर डिझेल तीन रुपये प्रतिलिटर प्रमाणे दरकपातीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर आता 6 हजार कोटींचा भार पडणार आहे.
पेट्रोल आणि डिझेल वरील दरवाढीमुळे सर्वसामान्यांनची चिंता वाढू लागली होती. अशातच पेट्रोल पाच रुपये तर डिझेल तीन रुपये प्रतिलिटर प्रमाणे दर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे महागाईने त्रस्त सर्वसामान्यना काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देणार असल्याचा शब्द दिला होता. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केल्यानंतर राज्य सरकारने व्हॅट कमी करावा अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांना केली होती. अनेक राज्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर व्हॅट कमी केला होता. मात्र महाराष्ट्रात याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता.
त्याचबरोबर नियमित कर्डफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही हे अनुदान देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.