मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले आहेत. आज राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत बोलताना एकाच वाक्यात म्हटले की, लवकरच बारावीच्या परीक्षेचा निकाल घोषित होईल. राजस्थान, उत्तराखंड, गुजरात, पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये 12वीचा निकाल लागला आहे, आता महाराष्ट्राच्या निकालाची प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालकांना आहे. देशाच्या पातळीवरील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची दिशा या निकालानंतर स्पष्ट होते. काही राज्यांनी आपले निकाल जाहीर केले आहेत, मात्र महाराष्ट्रासह काही राज्यांचे निकाल बाकी आहेत.
बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा आहे. बारावीचा निकाल याच आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.बोर्डाच्या शेवटच्या पेपरच्या 60 दिवसांनंतर निकाल जाहीर केला जातो ही प्रमाणित प्रक्रिया आहे. यावेळी बारावीचा पेपर 15 दिवस उशिरा सुरु झाला. त्यामुळे, आम्ही 10 जूनपर्यंत निकाल जाहीर करु, असे बोर्डाने सांगितले होते. त्यानुसार बारावीच्या परीक्षांचा निकाल पुढील आठवड्यात, तर दहावीचा निकाल जून अखेरीस लागणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या. मात्र अद्याप अधिकृतपणे परीक्षेच्या निकालाची तारीख घोषित झालेली नाही.
राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरु होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, 13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिले पाऊल हे कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थीनी परीक्षा दिली होती. तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाल्या आणि 7 एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.