बातमी एक्सप्रेस वृत्तसेवा, ब्रह्मपुरी :
ब्रह्मपुरी - नागभीड रोडवर असलेल्या तुलानमेंढा गावाजवळ वाघाच्या हल्लात ताराचंद्र चंदनखेडे (४५) रा. भगवानपुर हा इसम ठार झाल्याची घटना आज दि. २९ जूनला पहाटे ४.३० च्या दरम्यान घडली. सदर व्यक्ती डिझेल आणण्यासाठी अड्याळ वरून ब्रम्हपुरीला जात होता. वाटेत तो शौचासला गेला असता त्याच्यावर वाघाने झडप घेत त्याला ठार केले.
ताराचंद्र चंदनखेडे हे उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. काही वेळाने गावातील एका इसमाला रस्त्यावर गाडी दिसली. गाडीच्या दिशेने तपास केला असता वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे समजले. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी व पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित झाले.
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेले ताराचंद्र चंदनखेडे (४५) भगवानपूर येथील रहिवाशी होते. त्यांच्या मृत्यू मुळे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. सध्या ब्रह्मपुरी तालुक्यात वाघाचा चांगलाच धुमाकूळ घातला आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा निवेदन व आंदोलन केले. परंतु शासनाने त्याच्या पत्राला केराची टोपली दाखवली की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.