गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे उपकुलसचिव (परीक्षा विभाग) डॉ. गोविंदप्रसाद दुबे हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने त्यांचा निरोप समारंभ विद्यापीठ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल झेड. चिताडे आणि गोविंदप्रसाद दुबे यांची उपस्थिती होती.याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आणि पदव्युत्तर शैक्षणिक विभाग तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ. गोविंदप्रसाद दुबे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराविषयी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, भारताच्या भूमी ला जसे आपण आपली आई समजतो तसेच हे विद्यापीठ देखील आपली आई आहे. येथे काम करत असताना इतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे, कारण आपले भरण-पोषण या विद्यापीठाच्या द्वारेच होत असते. त्यामुळे प्रामाणिकपणे सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. नवीन कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातून बचत करणे आवश्यक आहे. कारण पेन्शन नसल्यामुळे पुढे भविष्यात काय असा प्रश्न उपस्थित होतो. सेवा काळात ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मला सहकार्य केले. त्यासाठी त्यांचेही मी आभार मानतो असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
आपल्या प्रास्ताविकात गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल झेड. चिताडे म्हणाले, 29 वर्षांची सेवा त्यांनी गडचिरोली ला दिली आहे. आधीच अधिष्ठाता म्हणून नागपूर युनिव्हर्सिटीला ते काम करत असताना, गोंडवाना विद्यापीठ नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र होते. देखरेख समितीवर असल्यामुळे वारंवार इथे भेटी होत होत्या, पण प्रत्यक्ष या वास्तूची वाढ होत असताना त्यांनी जवळून पाहिले आहे. अहेरी येथे बी. एड.कॉलेजला प्राचार्य असताना 2006 मध्ये नागपूर विद्यापीठात अधिष्ठाता होते. 2010 पर्यंत जवळपास साडेचार वर्ष ते अधिष्ठाता होते. 2012 ला साहाय्यक कुलसचिव, त्यानंतर 2015 ला उपकुलसचिव पदावर त्यांना प्रमोशन मिळाले. विद्यापीठातून निवृत्त होणारे ते पहिले अधिकारी आहेत. अतिशय मिलन सार आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाचे ते धनी आहेत, असेही ते म्हणाले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, 29 वर्षं त्यांनी गडचिरोली जिल्ह्याला सेवा दिली आहे . सेवानिवृत्तीनंतर आपल्या अनुभवाद्वारे समाजाला काही देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. अनुभवी व्यक्ती समाजात कार्य करतो तेव्हा त्याचा निश्चितच समाजाला फायदा होतो. त्यांच्या भावी जीवनाकरिता विद्यापीठाच्या वतीने मी शुभेच्छा देतो. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, उपकुलसचिव डॉ. हेंमत बारसागडे आणि डॉ. संदेश सोनुले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन आणि आभार मनिषा फुलकर यांनी केले.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.