गोंदिया : जिल्हा वनसंपदेने नटलेला असून जिल्ह्यातील वनक्षेत्र वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित मानले जाते. शिवाय गोंदिया जिल्ह्याशी संलग्नित असलेल्या इतर वनक्षेत्रातही वन्यप्राण्यांचा संचार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री सामाजिक संस्थांच्या मदतीने वन्यजीव विभागाकडून प्राण्यांची गणना करण्यात आली. दरम्यान गोंदिया जिल्ह्यासह सात संररक्षित वनक्षेत्रामध्य सर्ववर्गीय ३ हजार ६१ प्राणी संचार करीत असल्याचे दिसून आले. यामध्ये ६ वाघ, २३ बिबट या दोन प्रमुख प्राण्यांचा समावेश आहे.
गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगलक्षेत्र आहे. त्यामुळे जिल्हा वन्यप्राण्यांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. या अनुषंगाने जिल्ह्यात राष्ट्रीय दर्जाचा नागझिरा अभयारण्य, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प तसेच जिल्ह्याशी संलग्नित असलेल्या जिल्ह्यातील पिटेझरी, उमरझरी, कोका, बोंडे व डोंगरगाव या वनक्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात सर्ववर्गीय वन्यप्राणी संचार करतात. त्यामुळे, गोंदिया जिल्हा पर्यटकांच्या दृष्टिकोनातून आकर्षणाचा केंद्र ठरू लागला आहे. परिणामी, दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ जिल्ह्यातील वनक्षेत्राकडे वाढत चालला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बुद्ध पौर्णिमेच्या चंद्ररात्री वन्यजीव विभागाकडून प्राणी गणना करण्यात आली. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील संरक्षित वनक्षेत्रासह संलग्नित क्षेत्रामध्ये ३०६१ प्राणी संचार करीत असल्याचे समोर आले.
या क्षेत्रात करण्यात आली गणना
गोंदिया जिल्ह्यासह संलग्नित वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली. यामध्ये नागझिरा, पिटेझरी, उमरझरी, कोका, नवेगावबांध उद्यान, बोंडे व डोंगरगाव संरक्षित वनक्षेत्राचा समावेश आहे. यामध्ये नागझिरा क्षेत्रात ५३८, पिटेझरी क्षेत्रात ३३३, उमरझरी क्षेत्रात १०९, कोका क्षेत्रात ६६६, नवेगावबांध उद्यानात ८८४, बोंडे क्षेत्रात ३३७ व डोंगरगाव क्षेत्रात १९४ असे एकूण ३०६१ सर्ववर्गीय प्राणी दिसून आले.