आंध्र प्रदेश : पती आणि तीन मुलांसह रेल्वे स्टेशनवर वाट पाहत असलेल्या गर्भवती महिलेवर (Pregnant Women) सामुहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंध्र प्रदेशमधील रेपल्ले रेल्वे स्थानकात हा संतापजनक प्रकार घडला. रेल्वे स्थानकातच घडलेल्या या खळबळजनक घटनेनं तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
आंध्र प्रदेशातलील बापटला जिल्ह्यातील रेपल्ले रेल्वे स्थानकात शनिवारी रात्री एक कुटुंब ट्रेनची वाट पाहत थांबलं होतं. यावेळी तिघांनी संपूर्ण कुटुबांचं अपहरण केलं. त्यानंतर महिलेच्या पतीला जबर मारहाण केली. महिलेच्या पतीनं आरडाओरडा करुन मदत मागण्याचा प्रयत्नही केला. मात्र पोलिसांची कोणतीही मदत मिळाली नाही. शिवाय महिलाही जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात आता उपचार सुरु आहेत.
या घटनेतील एक आरोपी अल्पवयीनं असल्याची माहिती समोर आली आहे. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार शनिवारी रात्री उशिरा एक वाजण्याच्या सुमारास हा सगळा खळबळजनक प्रकार घडला. हे कुटुंब कामाच्या शोधात होतं. काम शोधण्यासाठी गुंटूरहून कृष्णा जिल्ह्याच्या दिशेने हे कुटुंब जाण्यासाठी रेल्वे स्थानकात आलं होतं. या दरम्यान पीडित महिलेच्या पतीनं धावत जात पोलिसांची मदत मिळवण्याचाही प्रयत्न केला. पण त्याला कोणत्याच पोलिसाची मदत मिळू शकली नाही. एकही पोलीस अधिकारी मदतीसाठी पीडित महिलेच्या पतीला मिळू शकला नाही.