कोरची तालुक्यात मागील पाच दिवसांपासून तेंदुपत्ता हंगामाला सुरूवात झाली आहे. तालुक्यातील गावागावातील महिला व पुरुष मजुर मोठ्या प्रमाणात तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी जंगलात जात आहेत. परंतु, आज सकाळच्या सुमारास मसेली येथील स्मिता जांभूळकर व सावली येथील केशव मेश्राम तेंदुपत्ता संकलना करिता गावाजवळ असलेल्या डोंगरावर गेले असता, रानडुकराच्या कळपाने त्यांच्यावर हल्ला केला. यात सदर महिला व पुरुष गंभीर जखमी झाले. मसेली व  सावली जंगलात असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने जवळ असलेल्या लोकांनी रानडुकराच्या कळपाला पळवून लावले. त्यामुळे दोघांचाही जीव वाचला.

घटनेची माहिती मिळताच १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेशी संपर्क साधून दोन्ही जखमींना कोरची ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने केशव मेश्राम यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले तर महिला मजूर स्मिता जांभूळकर यांना गोंदिया येथे रेफर करण्यात आले. त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी गावकरी व परिवाराकडून करण्यात आली आहे‌.