ब्रह्मपुरी :- तालुक्याला वैनगंगा नदीने आपल्या अजस्त्र विळख्यात वेढलेले आहे. वैनगंगेच्या पात्रातील वाळू म्हणजे रेती तस्करांसाठी 'पांढरे सोने 'च आहे. आतातर 'पुष्पा' चित्रपटाप्रमाणेच वैनगंगेच्या पांढऱ्या सोन्यावर डल्ला मारण्यासाठी तालुक्यातील एक 'पुष्पा' भाऊ 'सिंडीकेट'च चालवित आहे. तालुक्यातील काही रेतीघाटांवर या पुष्पाभाऊचे वर्चस्व पहायला मिळत आहे.
'पुष्पा' भाऊच्या नेतृत्वात तालुक्यातील अनेक रेतीघाटावर नियमबाह्य रेतीचा उपसा सुरू आहे. अनेक रेतीघाटांवर खनिकर्म विभागाने आखून दिलेल्या सिमांकनरेषेपेक्षा अधिक रेतीचा उपसा सुरू आहे. तर ब्रह्मपुरीतील महसूल अधिकाऱ्यांनी पुष्पाभाऊसमोर नांगी टाकत त्याच्या कुठल्याच गैरकृत्यांवर कारवाई न करता कळसच गाठला आहे. अवैध गौणखनिज चोरीचे ट्रॅक्टर ब्रह्मपुरीतून भरधाव जातात. त्या ट्रॅक्टर चालकांना 'पुष्पा' भाऊची चिथावणी असल्याचे बोलले जाते.
महसूल अधिकाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून हा पुष्पाभाऊ त्यांच्या कार्यालयात तासन्तास बसतो. त्यामुळे तहसील कार्यालयात तालुक्यातील आडवळणाच्या गावावरून येणाऱ्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. त्यामुळे महसूल अधिकारी हे जनतेचेसेवक की पुष्पाभाऊचे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. एकेकाळी सर्वसाधारण आयुष्य जगणारा हा पुष्पाभाऊ अत्यंत बेकारीपणाने या धंद्यातील छक्के पंजे शिकून आता कोट्यधीश झाला असून, कोट्यवधीची माया त्याने जमविली आहे. तालुक्यातील रेती वा मुरूमाची तस्करी असो, जमिनीची खरेदी-विक्री असो की अवैध दारूविक्री, या सर्व गैरकायदेशीर धंद्यांमध्ये पुष्पाभाऊ मागे नाही. पुष्पाभाऊने महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोक्यावरच्या शासकीय जागा कवडीमोल भावाने हडपल्या आहेत. वाममार्गाने पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी अनेकांचे राजकारण संपविण्याचाही प्रयत्नकेला आहे. आता तर स्थानिक स्वराज्य संस्थेतील एका सदस्याला हा पुष्पाभाऊ रोज मद्य पाजून घरी पाठवित असल्याने त्याचे राजकारण संपविण्याचा विडाच उचलल्याचे दिसत आहे.
जमिनीच्या अनेक खरेदी-विक्रीच्या कमिशनखोरीतही पुष्पाभाऊने आपल्या गुरुलाही मागे टाकल्याची चर्चा आहे. सद्यस्थितीत अत्यंत 'विलासी' जीवन जगणाऱ्या या पुष्पाभाऊला आमदारकीचे डोहाळे लागले आहे. पुष्पाभाऊचा 'पुष्पाराज' असाच वेगाने पसरत राहिल्यास पुष्पाभाऊच्या पालकांसाठी ही भविष्यात धोक्याची घंटा आहे, असे म्हटल्यास खोटे ठरणार नाही.