: तालुक्यातील वडसा वनपरिक्षेत्रात जळाऊ लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या काही इसमांवर पट्टेदार वाघाने हल्ला केला. त्यात एक इसम ठार झाला तर सोबत असलेल्या इतर लोकांनी कसाबसा तेथून पळ काढत आपला जीव वाचविला.
सविस्तर असे की, देसाईगंज तालुक्यातील उसेगाव जंगल परिसरात कक्ष क्र. ९३ मधे सकाळच्या सुमारास कुरुड येथील काही लोक जळाऊ लाकूड तोडण्यासाठी गेले होते. या वेळी अचानक एका पट्टेदार वाघाने हल्ला करत मधुकर मुरारी मेश्राम (५६ वर्षे) यांना ठार केले. वाघाने हल्ला केल्याचे दिसताच सोबतच्या इतर लोकांनी तेथून पळ काढला आणि ते थोडक्यात बचावले.
या घटनेची माहिती मिळताच वडसा वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी पंचनामा करून मृत इसमाचे शव ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. त्याच्या कुटुंबीयांना तात्पुरती नुकसानभरपाई म्हणून १५ हजार रुपये देण्यात आले. शासकीय नियमानुसार इतर
नुकसानभरपाईसाठी शासनास अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
दोन ते तीन महिन्यांपूर्वी वाघाच्या हल्ल्याच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात वाढल्या होत्या. आता पुन्हा अशा घटना होत आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.