नागपूर : इन्स्टा, फेसबुकवर ओळख होते अन् तो खरेच त्या गावचा रहिवासी आहे की नाही, त्याने स्वत:बाबत फेकलेल्या (सांगितलेल्या) गोष्टी खऱ्या आहे की नाही, ते न तपासाच त्याला काही जणी बॉयफ्रेण्ड बनवून घेतात. इथवर ठीक समजले तरी पुढे त्याला स्वत:चे चक्क न्यूड फोटो पाठविणाऱ्या युवतींना काय म्हणावे, असा प्रश्न पडतो. प्रचंड धक्कादायक तसेच विकृत मानसिकतेचा परिचय देणारे हे फॅड आले की काय अशी शंका यावी, अशी काही प्रकरणे गेल्या दोन ते तीन महिन्यांत उजेडात आली आहेत. महिला मुलींची बदनामी होऊ नये म्हणून पोलीस अन् पत्रकार या संबंधाने उघडपणे काही बोलत, लिहित नाहीत.
मात्र, उघड झालेल्या या घटनांना आकर्षण म्हणावे, प्रेम म्हणावे की विकृती, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. आमची फेसबुकवर ओळख झाली अन् आम्ही सलग चॅटिंग करू लागलो. प्रेमसंबंध जुळल्याने विश्वासही वाढला. त्याचमुळे त्याने मागितल्याप्रमाणे त्याला स्वत:चा न्यूड व्हिडिओ, फोटो स्वत:च्या मोबाईलवरून पाठविले. त्याने आता ते सर्व नातेवाईकांना पाठविले आहे, अशी तक्रार एका तरुणीने गेल्या आठवड्यात पोलिसांकडे नोंदवली. ही एकच तक्रार नाही. गेल्या दोन ते तीन महिन्यांत स्वत:चे न्यूड फोटो, व्हिडिओ पाठविणाऱ्या अर्धा डझन तक्रारी शहरातील विविध पोलीस ठाण्यात पोहचल्या आहेत. पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करतात अन् आरोपीवर कारवाईही करतात. मात्र, स्वत:चे अश्लील फोटो, व्हिडिओ पाठविण्याचा निर्ढावलेपणा दाखविणाऱ्या महिला-मुलींना कसे समजवायचे, असा प्रश्न उपस्थित होतो. खालील काही घटना प्रातिनिधिक स्वरुपाच्या असल्या, तरी समाजमनाला अंतर्मुख करायला भाग पाडणाऱ्या ठराव्यात.