गोंदिया : नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पात गत काही दिवसांपासून पर्यटकांना वाघांचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. परिणामी, या अभयारण्याकडे पर्यटकांनी पाठ फिरविली. आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्याघ्र प्रकल्पात चार वाघिणी आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. ब्रम्हपुरी वन्यजीव विभागातून या वाघिणी आणण्याचा प्रस्ताव असून वन्यजीव संशोधन संस्थेकडून त्यांची चाचपणी सुरू झाली आहे.
नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सद्य:स्थितीत आठ वाघ आहेत. त्यात तीन नर आणि पाच मादी वाघांचा समावेश आहे. मात्र, कोरोना संसर्गा नंतर पर्यटनाला ब्रेक लागला. डेहराडून येथील वन्यजीव संस्थेकडून नवेगाव – नागझिरा अभयारण्यात या संदर्भात तपासणीवर संशोधन करण्यात येत आहे. या अभयारण्यातील तृणभक्षी प्राण्यांची संख्या, पाण्याची उपलब्धता असा सर्वंकष विचार करून वनविभाग हा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाला सादर करेल. मंजुरी प्राप्त होताच टप्प्याटप्प्याने वाघिणींचे स्थानांतरण करण्यात येणार आहे. एक ते दोन वर्षे वयोगटातील चार वाघिणी स्थलांतरीत करण्यात येणार आहेत.