वर्धा : एकतर्फी प्रेमातून आरोपीने युवतीचा वारंवार पाठलाग करून माझ्यासोबत प्रेम करून लग्न दुस-यासोबत करत आहे, अशी चुकीची पोस्ट फेसबुकवर व्हायरल करून युवतीची बदनामी केली. तसेच, माझ्यासोबत लग्न कर अन्यथा मी मेल्यास तू जबाबदार राहशील, अशी धमकी फेबसबुकवरून दिली आहे. ही घटना आष्टी तालुक्यातील साहूर येथून उजेडात आली आहे.
पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहूर येथील २३ वर्षीय युवती तळेगाव येथे शिक्षण घेते. तिच्या नात्यातील पंकज मारोतराव महात्मे हा युवतीच्या घरी यायचा. त्याने युवतीच्या कुटुंबीयाकडे लग्नाची मागणी घातली. परंतु, त्याला युवतीसह कुटुंबीयांनी नकार देत त्याला समजावले. त्यानंतरही सदर आरोपीने युवतीचा पाठलगा सुरूच ठेवत माझेशी लग्न कर, असा अट्टाहास धरला. पुन्हा युवतीच्या कुटुंबीयांनी आरोपीला समज दिली.
त्यानंतर सदर युवतीचे फेब्रुवारी २०२२ मध्ये अमरावती येथील युवकांशी लग्न जुळले. त्यांचा साखरपुडाही संपन्न झाला. याची माहिती आरोपी पंकज महात्मे याला मिळाल्यानंतर त्याने सदर मुलीने प्रेम माझ्यासोबत करून लग्न दुस-यासोबत करत आहे, मी मेलो तर ती दोषी राहील, असा मजकूर इंग्रजीमध्ये टाईप करून फेसबुकवर पोस्ट केला. त्यानंतर त्याला समजावूनही ऐकत नसल्याने या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून पंकज मारोतराव महात्मे (वय ३०) रा. तळेगाव याच्याविरुद्द आष्टी पलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.