- तीन संशयीतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- तरूणीचे आईवडिल भद्रावतीत दाखल
चंद्रपूर : भद्रावती शहरातील ढोरवासा-पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतात निर्वस्त्र अवस्थेत शिर नसलेला मृतदेह आढळून आलेल्या ‘त्या’ तरूणीची ओळख पटल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या घटनेत स्थानिक गुन्हे शाखेने आज शुक्रवारी(8 एप्रिल) तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. सदर तरूणीचे आईवडिल नातेवाईकांसह भद्रावतीमध्ये दाखल झाले आहे. सदर घटनेला दुजारा मिळण्यासाठी अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी आज बोलण्याचे टाळून उद्या या घटनेबाबत माहिती देणार असल्याचे सांगितले.
सोमवारी (4 एप्रिल) ला सकाळी अकराचे सुमारास अंदाजे 25 वर्ष वयोगटातील एका अनोळखी तरूणीचा शिरच्छेद केलेला मृतदेह ढोरवासा पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतशिवारात आढळून आला होता. चार दिवसांपर्यंत ना त्या तरूणीच्या मृतदेहाची ओळख पटली, ना आरोपींचा सुागावा लागला. आज पाचव्या दिवशी 8 एप्रिल ला सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, त्या तरूणीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. निर्वस्त्र अवस्थेत मृतदेहाजवळ आढळून आलेल्या काही वस्तूंच्या माध्यमातून,तसेच सदर तरूणीच्या हत्येच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रकाशीत झाल्याने आणि जिल्हा आंतरजिल्ह्यातील पोलिस ठाण्यात मॅसेज देवून ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. शिवाय शेकडों पोलिसांचा फौजफाटा या घटनेच्या चौकशीत लागला होता. सदर तरूणीवर सामुहिक अत्याचार करून पुरावा नष्ट करण्याच्या उदेश्याने मृतदेह भद्रावतीत आणून टाकण्यात आल्याचा संशय सर्वत्र व्यक्त करण्यात येत होता. आज शुकवारी त्या तरूणीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती सायंकाळी समोर आली. मात्र स्थानिक पोलिसांनी या बाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.
वर्तमानपत्रात प्रकाशीत झालेल्या बातम्यांमधून त्या तरूणीची हत्या झाल्याची माहिती तिच्या आईवडिलांना मिळाली असल्याचे सुत्रांचे म्हणने आहे. तरूणीचे आई वडिल भद्रावतीत दाखल झाले असून पोलिस प्रशासन त्यांच्याकडून त्या तरूणीची योग्य तऱ्हेने ओळख पटविण्यासाठी खात्री करीत असल्याची माहिती आहे. सदर तरूणी ही नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळील मन्सर येथील असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांकरिता दिलासादायक बाब म्हणजे तरूणीची ओळख पटविण्यास यश आल्याने आरोपींचा शोध घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेने आजच तीन संशयीतांना ताब्यात घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. या बाबत स्थानिक पोलिसांनी दुजोरा दिला नसला तरी अप्पर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी मात्र आज सांगण्याचे टाळून उद्या सर्व माहिती दिल्या जाईल असे सांगितले आहे. मुलीची ओळख पटल्यानंतर तिची हत्या कुणी केली, कशासाठी केली, आरोपींनी मुंडके कोठे टाकले आहे, किती आरोंपीचा घटनेत समावेश आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे त्या तरूणीची ओळख पटल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक पत्रकारांनी पोलिसांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना माहिती देण्याचे टाळून अधिकाऱ्यांपर्यंम पोहचण्यास मज्जाव केल्याने पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.