चंद्रपूर : निवस्त्र तरुणीचे धडापासून शिर वेगळे करून तिची हत्या करण्यात आली. या तरुणीचे चार दिवस लोटूनही शिर न मिळाल्याने तरुणी कोण आहे, हेच पोलिसांना कळू शकले नाही. त्यामुळे पोलीस तपासाबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मोबाईल लोकेशन व शहरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासाला गती मिळाली असून लवकरच प्रकरणाला दिशा मिळणार असल्याचे ठाणेदार गोपाल भारती यांनी सांगितले.
गवराळा शेत शिवारातील परिसरात ४ एप्रिलला २५ वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत मुंडके नसलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. ती तरुणी कोण, शहरातील की जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील की परप्रांतातील याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. या घटनेच्या तपासासाठी पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक, अधिकाऱ्यासह जवळपास दोनशे पोलीस तपासाच्या कामी लागले आहेत. वेगवेगळ्या दिशेने तपास चक्रे फिरविण्यात येत असून लवकरच प्रकरणाचा छडा लावण्यात येणार असल्याचे पोलीस विभागातर्फे सांगण्यात येत आहे.
"मृत तरुणीचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे करण्यात आले असून त्याचा अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा अहवाल आल्यानंतर पुन्हा तपासाला वेगळी दिशा मिळणार आहे. तरुणीवर अत्याचार झाला किंवा नाही, तिचा नेमका मृत्यू कशाने झाला, मृत्यू झाल्यानंतर शिर धडापासून वेगळे केले का, ते या अहवालावरूनच स्पष्ट होणार आहे. सध्या पोलीस विभागाला या अहवालाची प्रतीक्षा आहे".