नागपूर : उष्णतेच्या लाटेने राज्य होरपळून निघत असून, शुक्रवारी चंद्रपूरने तापमानात जगात उच्चांक केला आहे. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील जळगाव, मालेगाव, अकोला, वर्धा या शहरांचे तापमानही ४३ अंशाच्या वर नोंदले गेले. प्रत्यक्षात आज चंद्रपूरच्या तापमानात ०.४ अंशांची घट हाेऊन ४३.६ अंशांची नाेंद करण्यात आली, हे विशेष. गुरुवारी ते ४४ व त्यापूर्वी ४४.६ अंश हाेते. ३१ मार्चला कॅमरूनच्या गॅराैआ शहराचे तापमान ५४ अंश नाेंदविण्यात आले हाेते. याशिवाय माली देशाचे कायस आणि नारा व सेनेगलचे माटम शहर तापमानाच्या उच्चांकीवर आहे. हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चाेपणे यांच्या मते, सध्या पारा सरासरीएवढाच असला तरी त्याची तीव्रता अधिक जाणवत आहे.
जगातील सर्वांत उष्ण शहरांच्या यादीत केवळ चंद्रपूर नाही, तर इतरही जिल्ह्यांचा समावेश आहे. ३१ मार्चला ४३ अंशापेक्षा अधिक पाऱ्यासह अकाेला आणि वर्धा पहिल्या १५ शहरांमध्ये हाेते. १ एप्रिलला ४३.१ अंश तापमानासह अकाेला जगात दहाव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ४३ अंशांसह अहमदनगर ११ व्या, ब्रह्मपुरी १२ व्या व मालेगाव १४ व्या क्रमांकावर आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.