कुरखेडा: कुटुंबीय किंवा पतीसोबत कोणताही उघड वादविवाद नाही की भांडण-तंटा नाही. तरीही एका विवाहित महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याची रहस्यमय घटना बुधवारी (दि.६) तालुक्यातील सोनसरी येथे घडली. कुंदा श्रीकांत दहीकर (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे.
कुंदा हिचे गेल्यावर्षीच लग्न झाले होते. पती श्रीकांत शेतकरी आहे. नेहमीप्रमाणे सकाळी ती पतीसोबत फिरायलाही (मार्निग वॉक) गेली होती, अशी माहिती आहे. तिकडून परत आल्यानंतर ती आपल्या बेडरूममध्ये गेली आणि आतून कडी लावून घेऊन पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
बराच वेळ झाला तरी ती खोलीतून बाहेर आली नसल्याने घरच्या मंडळींनाशंका आली. त्यांनी आवाज दिला, पण कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. पोलीस पाटील व शेजाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास दरवाजा तोडण्यात आला. यावेळी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.
विशेष म्हणजे कुंदा ही दोन महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती आहे. त्यामुळे तिच्यासोबत होणाऱ्या बाळाचाही जन्म घेण्याआधीच शेवट झाला. घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. अधिक तपास ठाणेदार अभया आष्टेकर, उपनिरीक्षक नारायण शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक टिकाराम कन्नाके करीत आहेत.