मुंबई: कोरोनाच्या (Corona) संकटामुळे शाळा ऑनलाईन पद्धतीने (Online School) सुरु होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरळीत सुरु झाल्या आहेत. मात्र मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे यंदा राज्यातल्या शाळांतील पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग एप्रिलमध्येही पूर्णवेळ सुरु ठेवण्याचे (Schools To Remain Open In April) आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टी एप्रिलपासून न देता संपूर्ण महिना विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच अभ्यासक्रम लवकर संपावा म्हणून शनिवारी पूर्णवेळ व रविवारी ऐच्छिक स्वरुपात विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाऊ शकते असा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी (Summer Holidays) लांबली आहे. दरम्यान या निर्णयामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात नाराजीचा सूर आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून शाळा बंद ठेऊन ऑनलाईन शिक्षण सुरु होते. यामुळे विद्यार्थ्यांचा वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकलेला नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पुन्हा उजळणी घेण्यासाठी शाळांनी एप्रिल महिन्यांत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिली ते नववी व ११ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहावे लागणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शनिवार पूर्णवेळ व रविवारी ऐच्छिक स्वरुपात मुलांना शाळेत हजर राहावे लागणार आहे. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेऊन मेमध्ये निकाल जाहीर करावा असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे मुलांची उन्हाळी सुट्टी यंदा लांबणार आहे. दरम्यान उन्हाळ्यात शाळा सुरू ठेवण्यावरून पालक आणि शाळा प्रशासनामध्ये मात्र नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरवर्षी उन्हाळी सुट्टीमध्ये पालक आपल्या मुलांना घेऊन सहलीसाठी किंवा नातेवाइकांकडे जातात. अनेकांनी रेल्वेची बुकींगही केली आहे, मात्र सुट्टी लांबल्याने पालकांना हे नियोजन करता येणार नसल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.