मुंबई : गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे (Corona Restrictions ) नियम पाळणाऱ्या राज्यातील जनतेला आता या निर्बंधापासून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. येत्या एक एप्रिलपासून राज्यात निर्बंध शिथील करण्यात येण्याची शक्यता आहे. आज किंवा गुरुवारी याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. मात्र, निर्बंध शिथील केले तरी मास्कचा (Using Mask is Compulsory) वापर करणं अनिवार्य असणार आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील कोविड व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील बहुतांशी लोकांनी कोव्हिड प्रतिबंधक लस घेतली आहे. वेगाने लसीकरण झाल्याने कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी टळले आहे. त्यामुळे आता कोरोना निर्बंध शिथील करण्याचा निर्णय संबंधित समितीने घेतला आहे. निर्बंध शिथील झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे मास्कचा वापर न केल्यास होणारी दंड आकारणीही रद्द होऊ शकते अशी चर्चा आहे. कोरोना निर्बंध शिथील केले तरी मास्कचा वापर नागरिकांनी करावा यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येणार आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.