वडीलांचा मृतदेह घरात, मुलीने परीक्षा केंद्रावर जाऊन सोडवला दहावीचा पेपर |
चामोर्शी:- आजारपणामुळे वडिलांचे रात्री अचानक निधन झाले. पण पित्याच्या मृत्यूचे दु:ख आवरत सकाळी दहावीचा पेपर सोडवायला गेलेली एक विद्यार्थिनी चामोर्शी तालुक्यात कौतुकाचा विषय झाली आहे. डोळ्यांतील अश्रूंना आवरत तिने मोठ्या हिमतीने बोर्डाच्या परीक्षेचा पूर्ण पेपर सोडवत आपले शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचविले. ही घटना चापलवाडा या गावात घडली.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, चामोर्शी तालुक्यातील घोट या गावापासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या चापलवाडा गावात राहणारे शेतकरी सुनील दुंदलवार (४५ वर्ष) यांचे गेल्या सोमवारी रात्री उशिरा आजारपणामुळे निधन झाले. या घटनेमुळे दुंदलवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
चापलवाडा गावातही शोककळा पसरली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू होणार असताना वडिलांच्या निधनाने दहावीत असलेल्या आर्या दुंदलवार हिच्यावर मोठे संकट कोसळले.
परीक्षा केंद्रावर जाऊन दहावीचा पेपर सोडवायचा की वडिलांचे अंतिम संस्कार करायचे, या व्दिधा मन:स्थितीत ती सापडली होती. यावेळी तिला काही नातेवाईकांनी धीर दिला, यामुळे तिला हिंमत आली. दु:ख पचवत आर्या सकाळी पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेली. ती घराबाहेर पडल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आणि आर्या घरी परतताच मृतदेह घराबाहेर काढण्यात आला.
परीक्षा केंद्र तीन किलोमीटर अंतरावर चापलवाडा गावापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मक्केपल्ली गावातील साईनाथ विद्यालयात आर्या दहावीत शिकत आहे. यावर्षी कोविडमुळे शिक्षण मंडळाने स्थानिक शाळांमध्ये परीक्षा केंद्र ठेवली आहेत. त्यामुळे आर्याला तिच्या शाळेत जाऊन पेपर द्यावा लागला. या दुःखद परिस्थितीतही आर्याने गावातील इतर विद्यार्थ्यांसह तीन किलोमीटर अंतरावरील शाळेत पोहोचून दहावी बोर्डाचा पहिला पेपर सोडवला.
नवीन आदर्शदायी उदाहरण
आर्याची आई आणि नातेवाईकांनी तिला समजावून सांगितले आणि तिची भविष्यातील स्वप्ने साकार करण्यासाठी तिला प्रथम परीक्षेचा सामोरे गेले पाहिजे. तिचा पेपर झाल्याशिवाय वडिलांवर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. यामुळे आर्याला प्रोत्साहन मिळाले आणि तिने केंद्र गाठून आधी पेपर दिला. आर्याच्या या धाडसी निर्णयाने समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.