नाशिक : नंदुरबार जिल्ह्यातील संशयित नितीन सखाराम पाटील (५४, रा. आमलाड, ता. ताडोदा) याने इंदिरानगर भागातील एका महिलेला तिच्या भावाला नोकरीला लावून देण्याचे तसेच महिलेसोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करीत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. मागील वर्षात २५ जुलै ते २८ डिसेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. महिलेला तिची फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तिने इंदिरानगर पोलीस ठाण्यात नितीन पाटील याच्यासह अन्य सहा संशयितांविरोधात फिर्याद दिली, त्यानुसार पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन पाटील याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखविण्यासोबतच तिच्या भावाला चांगली नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केली.
हे देखील वाचा:
|हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : अभिनेत्रीकडून सुरू होता वेश्याव्यवसाय
याविषयीची सर्व वस्तुस्थिती संशयिताचे नातेवाईक अलका नितीन पाटील (४९, रा. आमलाड) यांच्यासह सतीश भगवान पाटील, सुवर्णा सतीश पाटील (रा. प्रकाशा, ता. शहादा), छोटूलाल दामू पाटील (रा. परिवर्धा, ता. शहादा), वसंत पाटील (रा. वेलदा, ता. निजर), वंदना तोरवणे (रा. कल्याणी बालसदन, ताडोदा) यांना माहिती असूनही त्यांनी संगनमत करून फसवणूक केल्याचे पीडित महिलेने तिच्या फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सातही आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक उघडे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.