गोंदियात तलावांच्या संवर्धनासाठी स्वयंसेवकांची धडपड अजूनही सुरूच.
गोंदिया : जलाशयाच्या पर्यावरण व जैवविविधतेवर इतर घटक निर्भर असतात. परंतु, जलाशयांचे पर्यावरणच खराब असेल तर हे घटक पाठ फिरवितात. तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सध्या अशीच परिस्थिती उद्भवली आहे. सारस आणि स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर असलेल्या या जिल्ह्यातील जलाशयांचे पर्यावरण टिकविण्यासाठी स्वयंसेवकांनी धडपड सुरू केली आहे. जलाशये टिकविण्याच्या मूळ कारणांचा शोध घेतला. जिल्ह्यातील ३० तलावांसाठी त्यांनी समाजाधारित संवर्धनावर अभ्यासपूर्ण व्यवस्थापन आणि कृती आराखडा तयार केला असून, मागील ६ वर्षांपासून यावर काम सुरू आहे.
गोंदिया तलवांचा जिल्हा आहे. एकट्या गोंदिया जिल्ह्यात काही दशकांपूर्वी ३० हजारांच्या आसपास जलाशये होती. परंतु, आता काहीच जलाशये शिल्लक राहिली आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली आहे, त्यावर पक्षी येतात. जलाशयांची गुणवत्ता घसरली आणि या पक्ष्यांची संख्याही कमी झाली. सारस संवर्धनासाठी काम करणाऱ्या सेवा संस्थेच्या चमूने या पक्ष्यांचा अधिवास असणारी जलाशये निवडली. सामाजिक वनीकरण, जैवविविधता विभाग व वनविभागाने सहकार्य केले असून, जलाशयांची स्थिती, त्यांची जैवविविधता, त्यावर येणारे पक्षी आणि पर्यावरण या सर्वांचा अभ्यास सुरू केला.
सारस पक्षांच्या भवितव्याचा व स्थलांतरित पक्षी वैभव जागतिक पातळीवर नेऊन ठेवण्यासाठी प्रशासन त्या दृष्टीने पावले उचलत आहे. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी सावन बहेकार, चेतन जसानी, मुकेश गौतम, अभिजित परिहार, अंकित ठाकूर, शशांक लाडेकर, कन्हैया उदापुरे, दुष्यंत आकरे ही तरूणाई कार्य करीत आहे. जलाशयांमध्ये गेल्या काही वर्षांत बेशरम (इकोर्निया) सारख्या वनस्पतींचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे जलाशयांची जैवविविधता नष्ट होत आहे. मासेमारी संघटना जलाशयांमध्ये कोणत्या प्रजाती मासे आणि किती प्रमाणात टाकतात, यावर नियंत्रण नाही. मग्रारोहयो आणि इतर योजनांच्या माध्यमातून होणाऱ्या निधीतून जलाशयांचे खोलीकरण होते. परिणामी वनस्पती नष्ट होतात.
तलावांचा संवर्धनासाठी पावले उचलण्याची गरज:
शासकीय, मालगुजारी तलाव, मध्यम प्रकल्प, खासगी असे जलाशयांचे अनेक प्रकार आहेत. जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत खासगी जलाशये होती. त्यातील ९० टक्के जलाशये संपले आहेत. या जलाशयांचे सिंचन मालकांपुरतेच राहिले आहे. जलाशयांची जागा शेतीने घेतली आहे. खासगी तलाव कसे वाचविता येतील, यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.
News By - Sources
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.