यवतमाळ | शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; वॉर्डनने दुर्लक्ष केल्याचा आरोप | Batmi Express

Yavatmal,Yavatmal News,Crime Yavtmal,Crime,शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; वॉर्डनने दुर्लक्ष केल्याचा आरोप

Yavatmal,Yavatmal News,Crime Yavtmal,Crime,शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; वॉर्डनने दुर्लक्ष केल्याचा आरोप
शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

यवतमाळ : 
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणात शासकीय नर्सिंग महाविद्यालय चालविले जाते. या महाविद्यालयात शिकणाऱ्या व शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीचा शनिवारी अचानक मृत्यू झाला.

या प्रकरणी वसतिगृहाच्या वार्डन व तेथील महिला कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिली आहे.
निकिता कैलास राऊत (१८, रा. तुपटाकळी, ता. दिग्रस) ही विद्यार्थिनी शासकीय नर्सिंग महाविद्यालयात एएनएम प्रथम वर्षाला होती. तीन दिवसांपासून ती आजारी असल्याची माहिती मिळाली आहे.

हे देखील वाचा:

आत्महत्या | घुंगशी बॅरेज प्रकल्पात मायलेकीचा बुडून मृत्यू

तिला शासकीय वसतिगृहातील वार्डन व राठोड नामक महिला कर्मचारी यांच्याकडून सहकार्य मिळाले नाही. त्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले.शनिवारी दुपारी २.५८ वाजता वसतिगृहातून निकिताची प्रकृती बिघडल्याचा फोन आला. तिला घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले. गावावरून यवतमाळला पोहोचेपर्यंत निकिताचा मृत्यू झाला होता. वसतिगृहातील वार्डन व कर्मचारी यांनी लक्ष न दिल्यामुळे निकिताला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. यातच तिचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणात दोषी असणाऱ्या वार्डन जारुंडे व महिला कर्मचारी राठाेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कैलास राऊत यांनी तक्रारीतून केली आहे. निकिता राऊत हिची शवचिकित्सा इन कॅमेरा करण्याचीही मागणी त्यांनी केली. गुन्हा दाखल होईपर्यंत निकिताचा मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका तिच्या पालकांनी घेतली.
संभाजी ब्रिगेडचे सूरज खोब्रागडे, शुभम पातोडे, अनिकेत मेश्राम, जुनेद सय्यद, सुरज पाटील, सम्यक वाघमारे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी हा मुद्दा लावून धरला. रुग्णालय परिसरात रविवारी सकाळीच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, शहर ठाणेदार प्रशांत मसराम यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. निकिताची शवचिकित्सा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या चमूकडून करणे सुरू होते.
नर्सिंग अधिकारी व वार्डनचा काढला पदभार
संभाजी ब्रिगेड व निकिता राऊत यांच्या नातेवाइकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी वार्डन स्वाती जरुंडे व नर्सिंग अधिकारी अनिता राठोड यांच्याकडचा पदभार काढून घेतला. तसेच या दोघींचीही चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच निकिताच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.