बहिण भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा 'भाऊबीज' हा सण
Bhaubij: बहिण-भावाचा नात्यातला गोडवा वाढवणारा, नात्याची वीण घट्ट करणारा हा सण. भाऊबीज या सणाची सुरुवात झाली, ती यम आणि यमी पासून असे मानतात. यमराजाची बहीण यमी हिने त्याला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. पण आपण तर जिथे जातो तिथे कर्दनकाळ म्हणून उभे ठाकतो, असा विचार करून यमाने बहिणीच्या घरी जाणे टाळले. यमीने वारंवार आग्रह केल्यानंतर कार्तिक शुक्ल पक्षाच्या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला. बहिणीने भावाचे औक्षण केले, त्याला पंचपक्वान्न खाऊ घातले. बहिणीच्या प्रेमामुळे संतुष्ट झालेल्या यमाने तिला वर मागायला सांगितले. तेव्हा या दिवशी जी बहीण आपल्या भावाचे औक्षण करेल, त्या भावाला मृत्यूचे भय नसेल असा वर मागितला. या कथेनुसार तेव्हापासून भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणीने त्याला ओवाळण्याची प्रथा आहे. म्हणूनच या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते.
द्वितीयेचा चंद्र आकर्षक आणि वर्धमानता दाखवणारा आहे. बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो, अशी यामागची भावना आहे.
दीपोत्सवातला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज. मनातला द्वेष -असूया निघून जाऊन बंधुभावाची कल्पना जागृत करण्याचा संदेश देणारा हा सण. दिवाळीच्या आनंदातला हा एक महत्त्वाचा क्षण बहिण-भावाच्या भेटीमुळे अविस्मरणीय ठरतो.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.