काँग्रेस म्हणजे सेवा. काँग्रेस म्हणजे कार्य
Gadchiroli News: काँग्रेस म्हणजे सेवा. काँग्रेस म्हणजे कार्य. आणि युवक काँग्रेस म्हणजे सेवाव्रती उच्च कार्य. गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसने आपले आदर्श जोपासत नक्षलग्रस्त, दुर्गम, आदिवासीबहुल भागात कोरोना काळात जे कौतुकास्पद कार्य केले आहे, ते अमोघ आणि अभिमानास्पद आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसला व जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांना प्रशस्तीपत्र दिले.
हेही वाचा: देसाईगंज-कोरेगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार
केंद्र सरकारविरोधात दिल्लीत आवाज बुलंद करण्यासाठी आयोजित युवक काँग्रेसच्या संसद घेराव आंदोलनात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसची टीम जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाली होती. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी विशेषतः महाराष्ट्र राज्यातील निवडक कर्तृत्ववान जिल्हाध्यक्ष मंडळीसोबत चर्चा केली व त्यांचे कौतुक केले. त्यात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचाही प्रामुख्याने समावेश होता.
कोरोना या जागतिक महामारीच्या काळात संपूर्ण देशात काँग्रेस व युवक काँग्रेसने सेवाकार्य केले. त्यातून जनतेला मोठा दिलासा मिळाला. गडचिरोली जिल्ह्यात ही परिस्थिती अधिक भयावह होती. येथील आरोग्य यंत्रणा रुग्णालयात काम करत असताना युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णालया च्या बाहेर सेवाकार्य करीत होते. रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे ,रूग्णांना रक्त उपलब्ध करणे त्यांची अत्यावश्यक गरज पूर्ण करणे, रुग्णाच्या नातेवाईकांना भोजन व्यवस्था करणे, प्रसंगी आर्थिक व इतर सर्व प्रकारची मदत करणे, अशा कामात गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वाखाली सतत कार्यतत्पर होते, याची संपूर्ण माहिती खासदार राहुल गांधी यांना अवगत होती.
हेही वाचा: गडचिरोली जिल्ह्यात 7 कोरोनामुक्त, तर 3 नवीन कोरोना बाधित
सलग अडीच महिने हा उपक्रम युवक काँग्रेसने राबविला, त्याला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नेत्यांनी व समाज घटकातील संवेदनशील मनानी सहकार्य केले, अशी प्रतिक्रिया यावेळी ब्राम्हणवाडे यांनी खासदार राहुल गांधी यांच्यापुढे व्यक्त केली. त्याचे कौतुक करीत गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसने हे सेवाकार्य असेच पुढे सुरू ठेवावे, अशा सदिच्छा खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केली. सोबतच महेंद्र ब्राम्हणवाडे व संपूर्ण गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या टीमचे कौतुक केले. या वेळी उपस्थित अखिल भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी वि ,महाराष्ट्र राज्य चे सहप्रभारी मा.विजय सिंग जी,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष मा.सत्यजित दादा तांबे,प्रदेश उपाध्यक्ष मा.कुणाल दादा राऊत सह जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.