- टाळेबंदी संदर्भात नवीन नियमावली जाहीर
- बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने / आस्थापना शनिवार, रविवार पूर्णपणे बंद
- लग्न समारंभासाठी 50 व्यक्ति तर अंत्यविधी करीता 20 जणांची परवानगी
Chandrapur Lockdown New Guideline: राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना विषाणूचा 'डेल्टा प्लस' हा नवीन प्रकार आढळून आल्याने त्याचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याकरीता निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात आदेशित केले आहे. स्तर-3 मधील तरतुदीनुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात सोमवार दिनांक 28 जून 2021 पासून बाजारपेठेची वेळ ( अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने /आस्थापना ) आता सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद राहणार आहे.
◆ या गोष्टी राहतील सुरू :
अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने / आस्थापना दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. सार्वजनिक स्थळे, खुली मैदाने, चालणे, सायकलींग दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील. सर्व प्रकारची खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सांयकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. क्रीडा, खेळ, बाहेर मोकळया जागेत सकाळी 5 ते सकाळी 9 आणि सांयकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत सुरु राहतील. कोरोनाविषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषी, बँक, मान्सुनपूर्व कामाशी संबंधीत यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. चित्रीकरण सांयकाळी 5 वाजेनंतर बाहेर हालचालीस बंदी राहील. बांधकाम, शेती विषयक कामकाज सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. जमावबंदी सांयकाळी 5 वाजेपर्यंत तर संचारबंदी सायंकाळी 5 नंतर लागु राहील.
तसेच ई-कॉमर्स, सार्वजनिक क्षेत्रातील बस वाहतुक, माल वाहतूक (जास्तीत जास्त 3 व्यक्ती), आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कार, टॅक्सी, बस व ट्रेन) नियमितपणे पूर्ण वेळ सुरू राहील. तथापि प्रवासी जर स्तर-5 मधील भागातून येत असेल तर ई-पास आवश्यक राहील. याशिवाय उत्पादन निर्यात प्रदान उद्योग नियमितपणे सुरू राहतील. उत्पादन क्षेत्र, जीवनावश्यक वस्तूंची उत्पादन करणारे युनिट (जीवनावश्यक वस्तू व त्याकरिता लागणारा कच्चामाल उत्पादक पॅकेजिंग व संपूर्ण साखळीतील सेवा ), निरंतर प्रक्रिया उद्योग, राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन, डाटा सेंटर/ क्लाऊड सर्विस प्रदाता / माहिती व तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुंतीचे पायाभूत सेवा व उद्योग, कोविड वर्तणूक विषयक नियमांचे पालन करुन नियमितपणे पूर्ण वेळ सुरू राहतील.
◆ 50 टक्के क्षमतेने या बाबी राहतील सुरू :
रेस्टॉरेंट सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत 50 टक्के क्षमतेनूसार Dining साठी सुरु राहतील. तथापी सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत केवळ पार्सल सुविधा/ घरपोच सुविधा देता येईल. तसेच शनिवार व रविवार Dining पुर्णपणे बंद राहील व केवळ पार्सल सुविधा/ घरपोच सुविधा देता येईल. शासकीय कार्यालय उपस्थिती, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम, सभा, निवडणुक, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांची आमसभा (सभागृहाच्या 50 टक्के आसन क्षमतेने) सुरु राहतील. व्यायामशाळा / सलून / केस कर्तनालय / ब्यूटी पार्लर / स्पा/ वेलनेस सेंटर (अपॉइंटमेंट घेणे आवश्यक). उत्पादन क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा व निरंतर प्रक्रिया उद्योग, निर्यात प्रदान उद्योग, इतर उत्पादन क्षेत्रातील उद्योग व सेवा वगळता इतर उद्योग 50 टक्के क्षमतेने सुरू राहील. लग्न समारंभाकरीता केवळ 50 जणांची उपस्थिती तर अंत्यविधी 20 व्यक्तिंच्या मर्यादेत करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मॉल्स / सिनेमागृहे ( मल्टीप्लेक्स, सिंगल स्क्रिन) नाट्यगृहे संपुर्णत: बंद राहील.
वरील बाबींकरीता कोरोना विषयक वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक राहील. संपूर्ण चंद्रपूर जिल्हयातील मनपा, शहरी व ग्रामीण भागामध्ये कलम 144 अंतर्गत सकाळी 5 ते संध्याकाळी 5 या कालावधीत जमावबंदी लागू राहील. तसेच संध्याकाळी 5 ते सकाळी 5 या कालावधीत संचारबंदी लागू राहील सदर कालावधीमध्ये कोणत्याही व्यक्तीस मुक्तसंचार करण्यास मनाई असेल.
यात नियमितपणे मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन, आस्थापना / दुकानांच्या प्रवेशद्वाराजवळ ग्राहकांकरिता, प्रवेश करणाऱ्यांना हात धुण्याकरिता साबण किंवा हँड सॅनिटायझर ठेवणे आवश्यक राहील. शक्यतोवर गर्दी टाळावी. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांकरिता एकमेकांत सामाजिक अंतर पाळले जाण्याच्या दृष्टीने सामाजिक अंतरावर वर्तुळे तयार करणे यासारख्या बाबी कराव्यात.
सदर नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना महामारीची आपत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत संबंधित दुकान/आस्थापना बंद ठेवण्यात येईल. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित सभागृह,मंगल कार्यालय, लॉन, जागा यांचे मालक, व्यवस्थापक, हॉटेल रेस्टॉरंट व तत्सम आस्थापना यांचे व्यवस्थापक, मालक, दुकानदार, व्यापारी, संस्थाचालक यांचेवर पहिल्या चुकीसाठी उल्लंघनासाठी पहिला दंड रुपये पाच हजार, दुसरा दंड रुपये 10 हजार व तिसरा दंड रुपये 20 हजार याप्रमाणे तसेच कार्यक्रमाचे आयोजकांवर सुद्धा रुपये 10 हजार इतका दंड तात्काळ आकारण्यात येईल व इतरही नियमांप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. तसेच विना मास्क आढळलेल्या व्यक्तीवर, संबधितांवर रुपये 500 इतका दंड आकारण्यात येईल.
सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था , पोलीस विभाग व इतर संबंधित विभागाची राहील. कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 28 जून 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशात नमूद आहे.