नागभीड : गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या घोडाझरी उपकालव्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर प्रथमच पाणी सोडण्यात आले. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. पाणी सोडल्यानंतर अवघ्या काही तासांत नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) जवळील ओवाळा परिसरात उपकालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये शिरले. या घटनेत धानाच्या रोपांसह शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली असून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळावा या उद्देशाने घोडाझरी उपकालव्याची उभारणी करण्यात आली. अनेक वर्षांच्या कामानंतर कालवा सुरू करण्यात आला. पावसाअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान, पाणी प्रवाहित झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ओवाळा गावाजवळ कालव्याच्या एका भागाला भगदाड पडले. काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात पाणी शेजारच्या शेतांमध्ये घुसले. माहिती मिळताच सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुख्य प्रवाह तातडीने बंद केला. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी शेतात पोहोचल्याने धानाच्या पऱ्हे आणि नव्याने लावलेली रोपे पाण्याखाली गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या घटनेनंतर कालव्याच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की, कालवा सुरू होताच पहिल्याच चाचणीत भगदाड पडल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. यामुळे संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.
तसेच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना तातडीने आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, सिंचन विभागाकडून भगदाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असून, घटनेची कारणे शोधण्यासाठी अधिकाऱ्यांकडून प्राथमिक तपास करण्यात येत आहे.




कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.