चंद्रपूर :- जिल्ह्यात दोन दिवसापासून सगळीकडे मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. नागभीड तालुक्यामध्ये धक्कादायक घटना घडली असून एक 13 वर्षाचा मुलगा डोळ्या देखत पूराच्या पाण्यात वाहून गेला. जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पाऊसांमुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून बरेच पुल पाण्याखाली गेले आहेत.
नागभीड तालुक्यात विलम या गावामध्ये पूर आला होता.पूर पाहण्यासाठी रुणाल बावणे (वय 13 वर्षे) हा गावकऱ्यांसोबत नाल्यावरील पूलाकडे गेला होता. यावेळी पूल ओलांडताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्याच्या प्रवाहात गावकऱ्यांच्या डोळ्या देखत वाहून गेला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने त्याठिकाणी उपस्थित होते. पाण्याचा वेग पाहता पाण्यात उडी मारण्याचे कोणीही धाडस केले नाही. गावातील काही तरुणांनी पाण्यात उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. घटनेची माहिती नागभीड पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होऊन शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.