धानोरा:- धानोरा तालुक्यातील तोयागोंधी येथे एक विचित्र घटना घडली असून घरजावई व्हायची इच्छा नसल्याने एका युवकाने विष प्राशन करून जीवन संपल्याचा प्रकार समोर आला आहे. सुधाकर महारू पोटावी (वय २५) असे मृत युवकाचे नाव असून त्याने रविवार (ता. ९) दुपारी टोकाचे पाऊल उचलले.
प्राप्त माहितीनुसार मृत सुधाकर पोटावीचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. पण तो घर जावई बनून आला, तरच लग्न होईल, असा प्रस्ताव मुलीच्या घरच्यांकडून आला होता. त्यानुसार सुधाकरला त्याचे कुटुंबीय घरजावई म्हणून सुरसुंडी गावाजवळच्या शिवटोला येथे नेऊन देणार होते. परंतु त्याला घरजावई होणे पसंत नव्हते.
घरजावई होऊन शिवटोल्याला जाण्याच्या आदल्या दिवशी रविवारी सुधाकर पोटावीने आपल्या शेतातून आंबे आणून घरी दिले. त्यानंतर दुपारी तो पुन्हा शेतामध्ये निघून गेला. सायंकाळी तोयागोंदी येथे वादळी पाऊस आल्याने सर्व लोक घरी आले. मात्र सायंकाळ झाली, तरी सुधाकर घरी आला नाही म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी कुटुंबातील सदस्य शेतात गेले असता तो शेतात मृतावस्थेत आढळून आला. त्याला धानोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांला मृत घोषीत केले. त्यानंतर सोमवार (ता. १०) सकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह घरच्यांना सोपाविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास धानोरा पोलिस करत आहेत.