नागपूर : स्पा- सलूनच्या आड देहव्यापाराचा अड्डा चालविणाऱ्या पती-पत्नीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक करून गजाआड करीत एका पिडीतेची सुटका केली आहे. ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत बर्डे ले आऊट भुपेशनगरात शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली.
अंशुल मनोज बावनगडे (३०) आणि सिमा अंशुल बावनगडे (३४) दोघे रा. आनंद बुद्ध विहाराजवळ, बुद्धनगर, पाचपावली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी पती-पत्नीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत बर्डे ले आऊटमधील भुपेशनगर येथील द वेला युनिसेक्स स्पा-सलून अँड अॅकेडमी येथे देहव्यापार सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक कविता इसारकर यांच्यासह पथकाने सापळा रचून आरोपी पती-पत्नीला ताब्यात घेतले. ते महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करीत असल्याची बाब समोर आली. पथकाने आरोपीकडून तीन मोबाइल, मोपेड आणि १ हजार ५०० रुपये रोख असा एकुण १ लाख ९२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध गिट्टीखदान पोलिस ठाण्यात कलम ४, ५, ७ पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान पती-पत्नी मिळून देहव्यापाराचा अड्डा चालवित असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.