Murder: मैत्री, बिर्याणी आणि मर्डर; मित्रानेच केला मित्राचा घात! | Batmi Express

Gondia,Gondia Murdered,Gondia Marathi News,gondia news,Gondia Crime,Gondia Live,Gondia Today,

Gondia,Gondia Murdered,Gondia Marathi News,gondia news,Gondia Crime,Gondia Live,Gondia Today,

गोंदिया:-
 आमगाव येथील अंजोरामध्ये दोन मजूर कामानिमित्त एकत्र राहत होते. ते दररोज एकत्र जेवण बनवत होते. त्याच्यामध्ये बुधवारी दि. 26 जूनला स्वयंपाकामध्ये बिर्याणी बनवण्याच्या कारणांवरुन वाद झाला. वादातून तरुणाने आपल्याच मित्रावर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना उघडकिस आली आहे. शेरसिंग मंगलसिंग उईके (वय. 40 रा. बैगाटोला, मध्यप्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर बादल उर्फ रामचरण रामप्रसाद उईके (वय. 31 रा. बैगाटोला, मध्यप्रदेश) असे संशयीत आरोपीचे नाव आहे.


आमगाव तालुकापासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या अंजोरा बांबू डेपोमध्ये बालाघाट जिल्ह्यातील बैगाटोल येथील काही मजूर बांबू कापण्याचे काम करतात. दरम्यान, शेरसिंग उईके आणि संशयीत आरोपी बादल उर्फ रामचरण उईके हे दोघेही एकाच रुममध्ये राहत होते. बुधवारी त्यांनी बिर्याणी बनविण्याचा बेत आखला होता. मात्र, रात्री 9 वाजताच्या सुमारास बिर्याणी बनवताना दोघांमध्ये वाद झाला. त्यांचा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात बादलने शेरसिंगच्या छातीवर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले. यावेळी दोघांच्या वादाचा आवाज ऐकून घटनास्थळावर जमलेल्या इतर मजूरांनी रुग्णवाहिका बोलावली. मात्र, गंभीर जखमी झाल्याने शेरसिंगचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.


या घटनेची माहिती आमगाव पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आमगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी बांबू डेपोचे संचालक महेश भागचंद लिल्हारे (वय. 27 रा. अंजोरा, ता.आमगाव) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी बादल उर्फ रामचरण रामप्रसाद उईके, याच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यास अटक केली. पुढील तपास आमगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.