पवनी(भंडारा) :- मोहफुल गोळा करण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय इसमावर वाघाने झडप घालून ठार केल्याची घटना पवनी तालुक्यातील सावरला वनविभागात काल,गुरूवारी दिनांक- ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.ताराचंद लक्ष्मण सावरबांधे असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे नागरिकांनी रोष व्यक्त केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
विशेष म्हणजे मागील आठवड्यात २५ मार्च रोजी कन्हाळगाव येथील सीता श्रावण दडमल वय ६५ वर्ष ही मोहफूल वेचण्यासाठी गेलेली महिलासुद्धा वाघाच्या हल्ल्यात ठार झाली होती. सात दिवसांतील सलग दोन वेळा वाघाच्या हल्ल्यात बळीमुळे दहशत पसरली आहे.
ताराचंद सावरबांधे व त्यांचे कुटुंबीय मोहफुले वेचण्यासाठी प्रादेशिक वनविभागाच्या सावरला परिसरातील कंपार्टमेंट ३१३ मध्ये काल,गुरुवारी सकाळी गेले होते.सावरल्यावरून गावाकडे जाणाऱ्या मार्गावर मोहफूल वेचत असताना मुलगा व पत्नी दुसऱ्या झाडाकडे मोह वेचण्याकरिता गेले.दरम्यान वाघाने ताराचंदवर झडप घेत त्याच्या नरडीचा घोट घेतला.घटनेची माहिती गावात होताच गर्दी उसळली. प्रादेशिक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली.पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय पवनी येथे नेण्यात आले.दरम्यान जनतेचा रोष उसळल्याने तणावाची स्थिती उद्भवली होती.घटनास्थळी जिल्हा उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी निलक, डीवायएसपी मनोज सिडाम, ठाणेदार निलेश ब्राह्मणे व इतर वनाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.दरम्यान वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वाढल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.