चंद्रपूर : लाच घेणे व देणे कायद्याने गुन्हा आहे. याची पूर्णपणे जाणीव असताना देखील एका लाचखोर ग्रामसेवकास लाचेचा मोह टाळता आला नाही. शेवटी हा लाचखोर ग्रामसेवक आज चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात अलगद अडकल्या आहे.
बीबी चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील झिलबोडी ग्राम पंचायत कार्यालयात कार्यरत असणारा ग्रामसेवक पुरुषोत्तम यशवंत टेंभूर्णे यांनी तक्रारदारास तब्बल १५ हजार रुपयांची लाच मागितली होती.परंतू ही लाच देण्याची तक्रारदाराची मुळीच इच्छा नव्हती. शेवटी ग्रामसेवक व तक्रारदारात तडजोड होवून हा सौदा दहा हजार रुपयांत पक्का झाला. सौदा पक्का होताच व्यवसायाने ठेकेदार असलेल्या तक्रारदाराने चंद्रपूर गाठले व एसीबी कार्यालयात या ४८ वर्षीय लाचखोर ग्रामसेवक विरुद्ध तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पूर्णतः शहानिशा करुन आज शुक्रवार १६ फेब्रवारीला सापळा रचून अलगद आपल्या जाळ्यात अडकविले. सदर तक्रारदाराने संबंधित ग्रामपंचायत मधील काही बांधकामे केली होती .त्यांनतर त्या तक्रारदारास चेकव्दारे ३ लाख ९० हजार रुपये देण्यात आले होते. परंतु या लाचखोर ग्रामसेवकास त्या तक्रारदारांकडून लाच हवी होती.
सदर कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, लाच प्रतिबंधक विभाग चंद्रपूरच्या उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनूले, संदेश वाघमारे, वैभव घाडगे, राकेश जांभुळकर, विनायक वंजारी व पथकाथील अन्य कर्मचाऱ्यांनी केले. या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान चंद्रपूर येथील एसीबी पथकाच्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.