बल्लारपूर येथील वॉर्ड क्रमांक एक येथे राहत असलेल्या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवार (ता. 23) उघडकिस आली. मृताचे नाव सचिन भाऊजी वांगणे (वय 38) असे आहे. तो वाहनचालक होता. दारुच्या वादातून त्याची हत्या करण्यात आल्याची चर्चा गावात सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
सोमवारी विसापुरातील पंढरीनाथ महाराज मंदिरात राम मंदिर उत्सव पार पडला. दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी महाप्रसाद होता. महाप्रसादासाठी सचिनही गेला. तिथे जेवण केल्यानंतर तो घरी परतला. त्याची आई बाहेरगावी गेली होती. त्यामुळे तो एकटाच घरी होता. रात्रीच त्याची शस्त्राने हत्या करण्यात आली. सकाळी ही घटना उघडकिस आली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतक हा वाहन चालक होता. त्याला दारूचे व्यसन होते. दारुच्या वादातूनच त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने तपास सुरु आहे काही वर्षापूर्वी विसापूर येथील महिलांनी एकत्र येऊन गावात दारुबंदी केली. मात्र, अलीकडे गावातील चौकाचौकांत अवैध दारूविक्री सुरु आहे. त्यातूनच गावात अलीकडे हाणामारीच्या घटना वाढल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गेडाम यांनी सांगितले