चंद्रपूर : दोन दुचाकींची समोरासामोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना चंद्रपूर-मूल मार्गावरील घंटाचौकी-मामला फाट्याजवळ दुपारी ४ याजताच्या सुमारास घडली. अशोक कमलाकर बोबडे (२४) रा. अहेरी खामोना, असे मृताचे नाव आहे. तर रितीक हनुमान पेंदोर (२५) रा. कळमना वणी, स्वप्निल वारलू ढोले (२८) रा. अहेरी खामोना हे गंभीर असून जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. एमएच २९ बीझेड ५७६० व एमएच ३४ एक्यू ३३६६ या क्रमांकाच्या दुचाकीने अशोक बोबडे, स्वप्निल ढोले एक दुचाकीवर तररितीक पेंदोर एका दुचाकीने परस्पर विरोधी मागनि प्रवास करत होते.
घंटाचौकी व मामला फाट्याच्या मधात आल्यानंतर या दोन्ही दुचाकींची समोरासामोर धडक बसली. धडक इतकी भीषण होते की, दोन्ही दुचाकीवरील तिघेही जण दुचाकीवरून फेकल्या गेले. रामनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश हिवरे तर चिचपल्ली चे एपीआय वसंत रायसिडाम, पोलिस शिपाई प्रफुल्ल उमाटे यांनी घटनास्थळ गाठले. मात्र, यावेळी अशोकचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. रितीक व स्वप्निल गंभीर होते. त्या दोघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. त्या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.